कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रस्त्याचे दिवाळीपूर्वी पॅचवर्क पूर्ण करण्याच्यादृष्टीने महापालिका सक्रीय झाली असून शहरातील ४ विभागीय कार्यालयांतर्गत पॅचवर्कचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

दिवाळीपूर्वी कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. त्यानुसार महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित यंत्रणेला नियोजन करण्याचे आदेश दिले होते. मागील काही दिवसात परतीचा पाऊस असल्याने रस्त्यांचे पॅचवर्क होऊ शकले नाही. गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेच्या यंत्रणेने पॅचवर्कच्या कामास गती दिली आहे.

शहरातील प्रमुख आणि रहदारीच्या रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याचे नियोजन करुन महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत पॅचवर्कचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. पॅचवर्कचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे नियोजन असून या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.