मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी शर्थीची झुंज देत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्न पाण्याचा त्याग करत आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यांना बोलताही येत नाही. त्यामुळे याचे राज्यभरात पडसाद उमटत आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी 20 फेब्रुवारीला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आंदोलनाबाबत अधिसूचना जारी केली होती. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. शासनाकडून तसं पत्रही मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलं होतं. या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.