पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा जपला जाणारा पन्हाळागड तर पर्यटकांच्या अभावी सुनासुना पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीमुळे  पर्यटनस्थळांवर बंदी असल्यामुळे पन्हाळागड गेली ७ महीने पर्यटकांसाठी बंद आहे.

मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन भूस्खलन झाल्यामुळे ५ महिने पन्हाळगडाचा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद होता.  यावर्षी कोरोना महामारीमुळे पन्हाळगड बंद आहे. याचा फटका इथल्या व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असणारे जवळपास ७० टक्के लोक व्यावसायिक आहेत. यामध्ये गडावरील प्रसिद्ध झुणका भाकर, छोटे-मोठे खाद्यपदार्थ विक्रेते,  हॉटेल व्यवसायिक, लॉजिंग व्यवसायिक, भेलपुरी, घरगुती जेवण,  गेम्स व्यवसायिक, इतिहास सांगणारे गाईड अशा सर्व लहान-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन म्हणजे पन्हाळगडावरील पर्यटकच आहेत. त्याचबरोबर मायक्रो फायनान्स कंपन्यांचा लागलेला तगादा, भरमसाठ वीज बिले, धंदा नसताना सुद्धा हॉटेल-लॉजिंग भाडे भरणे यामुळे पन्हाळगडावरील व्यवसायिक हा पूर्ण अडचणीत आला आहे. तरी प्रशासनाने योग्य दखल घेऊन पन्हाळगड पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशा मागणीचे निवेदन गडावरील व्यावसायिकांकडून मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांना देण्यात आले. यावेळी संग्रमसिंह भोसले, मिलिंद कुराडे, प्रवीण शिंदे, अतुल लंबे, सुरज कासे आदी उपस्थित होते.