पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळ्यातील लीज असलेल्या जागेवर वीस वर्षांपासुन क्रिडांगण म्हणून राखीव जागा ठेवली होती. या जागेवरील आरक्षण उठवून लाखमोलाची जागा धनिकांच्या हातात जाणार की क्रिडांगण म्हणूनच राहणार. यासाठी काल (मंगळवार) एक खास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सत्तारुढ जनसुराज्यचे नगरसेवकच या ऑनलाईन सभेला गैरहजर राहीले. त्यामुळे या प्रकऱणाचे गुढ आणखी वाढले आहे.   

पन्हाळा शहरातील ६३९, ६४०, ६४१ गट नंबरच्या पन्हाळा क्लबजवळील जागा क्रिडांगणासाठी राखीव आहे. ही जमिन अंदाजे तीन एकर असून या ठिकाणी तालुका क्रिडा महोत्सव आणि विविध स्पर्धा नेहमी होत असतात. या शिवाय पन्हाळा हे व्हॉलिबॉल खेळाचे केंद्र आहे. यासाठी गेल्या वीस वर्षांपासून या दोन्हीही गट नंबरच्या जागा नगरपरिषदेने राखीव ठेवल्या आहेत. यापूर्वी नगरपरिषद सभागृहाने दोन वेळी अनुक्रमे २३/१०/१३ ठराव क्र.५६ व ७/४/१८ ठराव क्र.२० हे क्रिडांगण राखीव म्हणून ठराव केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली नाही. त्यामुळे सातबारा पत्रकी नाव दाखल झाले नाही. केवळ ६४१ गट नंबरला नगरपरिषदने देखभाल करावी असे इतर हक्कात नाव लागले आहे.

याचा गैरफायदा घेत धनीकांनी लाखमोलाची बोली लावत याठिकाणी विकऐंड घरे बांधण्याचे स्वप्न बघीतली आहेत. याला पन्हाळ्यातील कांही एजंट सामील झाले आहेत. नव्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते आरक्षण उठण्यात आले पण त्याला अट घातली गेली की नगरपरिषद सभागृहाचा याला ठराव पाहीजे. परंतु, हा ठराव होवू नये म्हणून सभागृहाचे विरोधी सदस्य माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी, विणा बांदिवडेकर, माधवी भोसले, मिनाज गारदी, संध्या पोवार या पाच सदस्यांनी क्रिडांगण रहावे म्हणुन खास सभेची मागणी केली.

काल होणाऱ्या या सभेकडे सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने कांहीतरी पाणी मुरतय हे आता पन्हाळावासियांच्या लक्षात येत आहे. आता विरोधक पण आक्रमक झाले असूनन त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.