कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओळखीचा फायदा घेत कोल्हापुरातील एका महिलेला तब्बल ६६ लाख रुपयांचा गंडा घालून, फरार झालेला संशयित अनिल म्हमाणे आज (शनिवार) स्वतःहून पोलिसात हजर झाला. याप्रकरणी रेखा दाभोळे यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिलीय. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागाळा पार्क परिसरात राहणाऱ्या जगनाथ दाभोळे यांच्या कुटुंबियांची पुस्तके छपाईच्या माध्यमातून अनिल म्हमाणे यांची ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेऊन म्हमाणे याने घरोब्याचे संबंध निर्माण केले. केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि इतर नवीन धोरणासादर्भात भीती घालून दाभोळे यांच्या खात्यावरील सुमारे ६६ लाख रुपये काढून ते चोरल्याची फिर्याद रेखा दाभोळे यांनी शाहूपुरी पोलिसात १८ सप्टेंबरला दिली होती. याप्रकरणात अनिल म्हमाणे याला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर त्याने अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे अनिल म्हमाणे आज दुपारी स्वतःहून शाहुपुरी पोलिसात हजर झाला. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.