कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मद्य विक्री राजरोसपणे सुरू आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैधरित्या मद्य विक्री करत लोकांचा फायदा घेतला जात आहे. प्रत्येक नगामागे मूळ किमतीपेक्षा २० ते २५ रुपये जास्त घेतले जात असून लोकांची राजरोसपणे लुट होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अशा विक्रेत्यांवर गेल्या दिड वर्षात अजूनही कारवाई झालेली नागी. अशा विक्रेत्यांना वरिष्ठ पाठीशी घालत आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

दाखवण्यापुरती किरकोळ कारवाई वगळता मोठ्या प्रमाणात यावर कारवाई अद्याप झालेली नाही. तसेच कळे पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकारी यांना याबद्दल विचारले असता, ‘तुम्ही तक्रार करा मग आम्ही कारवाई करतो’, अशा प्रकारची बेफिकीर वक्तव्ये ऐकायला मिळतात. पण प्रत्येक बाबतीत नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच पोलीस कारवाई करणार का? यांची काही वैयक्तिक जबाबदारी नाही का? तसेच अवैधरित्या मद्य विक्रेत्यांकडून हप्ता मिळावा म्हणून दुर्लक्ष केले जाते की काय ? असे सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करावी, आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमधून होत आहे.