कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारणविरहित केला, असेही ते म्हणाले.

कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या ठरावधारकांच्या संयुक्त मेळाव्यात  मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात एकूण ८३७ ठरावधारक आहेत. त्यापैकी ८०० महाविकास आघाडीचे आहेत. बँकेचे मालक म्हणून नव्हे तर, विश्वस्त म्हणून कामकाज केले.    माझ्यासह संचालक मंडळातील कोणीही कोणत्याही सुविधा घेतलेल्या नाहीत. माजी आ. महादेवराव महाडिक, आ. पी.एन.पाटील, आ. विनय कोरे यांच्यासह कुणीही या बँकेचा पाच पैशाचासुद्धा लाभ घेतलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यावर नियतीनेच सातत्याने अन्याय केला आहे, त्यांनाही योग्य तो मान सन्मान मिळावा, अशी आपली भावना आहे.

खा. संजय मंडलिक म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी बँकेच्या संचालक मंडळात गेल्यानंतर अत्यंत अडचणीत असलेल्या बँकेचा परवाना राहतोय की नाही, अशी शंका वाटत होती. केडीसीसी बँकेच्या निमित्तानेच मंडलिक गट आणि मुश्रीफ गट असा वाद निर्माण होऊन संघर्ष झाला होता. परंतु येत्या निवडणुकीत कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व संजयबाबा घाटगे गट एकत्र येत आहोत, ही चांगली गोष्ट आहे.

माजी आ. संजय घाटगे म्हणाले की, मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा ते मंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे म्हणून देत नाही. तर, अगदी मंत्रीपदापासून ते गावाच्या एखाद्या ग्रामपंचायत सदस्य व त्याखाली असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी त्यांची कामाची पद्धत आहे. म्हणूनच हा पाठिंबा देत आहोत, असे घाटगे म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील-बिद्री व धनराज घाटगे -वंदूरकर यांचेही मनोगत झाले. व्यासपीठावर बँकेचे संचालक अनिल पाटील, जि. प. सदस्य युवराज पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शिवानी भोसले, अमरीश घाटगे, मनोज फराकटे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे, गणपतराव फराकटे, बापूसाहेब शेणवी, रमेश तोडकर, सूर्यकांत पाटील, दिनकरराव कोतेकर, बाजीराव गोधडे, एम. आर. चौगुले, रमेश माळी, बापूसाहेब भोसले, जयसिंगराव भोसले, दत्ता पाटील, प्रवीणसिंह भोसले आदी उपस्थित होते.

बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने प्रास्ताविक केले. मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले.

उरलो उपकारापुरता…

मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक भाषणात नेहमी म्हणायचे, मी उरलो आता उपकारापुरता. आपले व संजयबाबा घाडगे यांचेही वय आता सत्तरीच्या घरात आहे. जय-पराजय, निवडणुका, लढाया हे सगळं आता झाले. वैर -मतभेद कुणाशी धरायचे?  त्यामुळे संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, तुका म्हणे….., आता मी उरलो विकासकामे आणि जनसेवेच्या उपकारापुरता, असेही ते म्हणाले.

सदैव मुश्रीफ यांच्याच पाठीशी….

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, गेली ३६-३७ वर्ष हसन मुश्रीफ यांच्याशी बिन तडजोडीचा संघर्ष केला. काही लोकांनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी आमचा वापर त्यांच्या विरोधात केला. परंतु, आता आम्ही ठरविले आहे की, यापुढे सदैव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच पाठीशी राहायचं.