सावित्रीबाई फुले यांच्याविषयी रिटा गुप्ता यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने शूद्रातिशूद्रांना शिकवून जातीव्यवस्थेवर प्रखर आघात केला; मात्र आज दोनशे वर्षे उलटल्यानंतरही जातीव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही, हे चिंताजनक आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी येथे व्यक्त केली.

‘सावित्रीबाई फुले: हर लाईफ, हर रिलेशनशीप, हर लिगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झाले. रिटा राममूर्ती गुप्ता यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहिलेल्या या पहिल्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. यशवंतराव थोरात यांनी काही प्रश्न विचारून लेखिका रिटा राममूर्ती गुप्ता यांना बोलते केले. सावित्रीबाईंविषयीच पुस्तक लिहावे, असे का वाटले? या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुप्ता म्हणाल्या, जेव्हा एका स्त्रीबाबत लिहिण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सावित्रीबाईंशिवाय माझ्यापुढे दुसरे कोणतेही नाव नव्हते. कोणताही सामाजिक बदल कोणा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून होत नाही. त्यास सामूहिक प्रयत्नांची गरज असते. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सगुणाबाई क्षीरसागर या तिघी म्हणजे माझ्या दृष्टीने भारताची संकल्पना होय. सावित्रीबाईंनी तर लहान असतानाच नायगावमध्ये अगदी एकलव्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न चालविलेला होता. म्हणजे तेव्हापासूनच शिकण्याची ऊर्मी त्यांच्यात होती. जोतिराव फुले यांच्यासारखा सखा लाभल्याने त्या ऊर्मी प्रत्यक्षात साकार झाल्या आणि पुढचा इतिहास घडला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सावित्रीबाईंनी त्यांच्या पहिल्या फळीच्या विद्यार्थिनींवर जो शिक्षणाचा संस्कार केला, प्रभाव टाकला, त्या अनुषंगाने संशोधन होणे हे आवश्यकच आहे. आजच्या पिढीतल्या सावित्रीच्या लेकींनाही आपल्या या संचिताचा अभिमान वाटला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास व संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी सावित्रीबाई, फातिमा शेख आणि सगुणाबाई या तिघींनी धर्म परंपरांना आव्हान देत शिक्षण प्रसाराचे केलेले कार्य अतुलनीय स्वरुपाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला बाळ पाटणकर, इंद्रजीत घोरपडे, डॉ. उषा थोरात, डॉ. भगवान हिर्डेकर, डॉ. अरूण शिंदे, डॉ. केशव हरेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.