मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असे सांगितले जात होते; परंतु तो मंत्रिमंडळ विस्तार आता रखडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडची अतिरिक्त खातीसुद्धा इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ कॅबिनेट मंत्री पकडून जवळपास २० मंत्री आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी शिंदे गटातील आमदार आणि भाजप आमदारांची मागणी होती; परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून महामंडळांचे वाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिपदाऐवजी आमदारांना महामंडळ देऊन खूश करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस करणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील ९ अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंतांकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुक्ल मंत्री असलेल्या शंभुराज देसाईंकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे असलेले परिवहन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे खाते सोपवले आहे. बंदरे आणि खनिकर्म मंत्री असलेल्या दादा भुसे यांच्याकडे पणन खाते दिले आहे.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खाते सोपवले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मृद आणि जलसंधारण खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि औकाफ खाते देण्यात आले आहे.

शालेय शिक्षणमंत्री असलेल्या दीपक केसरकरांकडे पर्यावरण व वातावरणीय बदल, सामान्य प्रशासन ही खाती सोपवण्यात आली आहेत. रोजगार हमी योजना मंत्री असलेल्या संदिपान भुमरेंकडे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडे माहिती आणि जनसंपर्क खाते सोपवण्यात आले आहे.