कोल्हापूर (प्रतिनिधी) : हाथरस (उत्तरप्रदेश) येथे घडलेल्या वाल्मिकी समाजातील युवती वरील अमानुष अत्याचार आणि हत्याकांडाचा समस्त मातंग समाज आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

कोल्हापूरातील बिंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पोलीस अधिकारी, जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करावे. अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी जोरदार घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला.

यावेळी अॅड. दत्ताजीराव कवाळे म्हणाले की, हाथरस प्रकरणांमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली आहे. सरकारने अत्यंत पक्षपाती भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून आरोपींना पाठीशी घालण्याचे दुष्कृत्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे थांबले पाहिजे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. महिलांच्या तसेच दलित आणि अल्पसंख्यांकांच्या अत्याचारावर कठोर पायबंद घालण्यासाठी शासकीय पातळीवर काम झाले पाहिजे.

यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, लहुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशालभाई देवकुळे, अॅड. सरदार किरवेकर, बहुजन सेनेचे अध्यक्ष आदिनाथ भाई साठे, बंडा अवघडे, अनिकेत वाघमारे, रमेश आपटे, युनिस पटवेगार, रमेश देवकुळे, गणेश पांढरबळे, अण्णाप्पा खमलेहट्टी, बाळासाहेब साळवी, अर्जुन बुचडे, दिनेश पोतदार, भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे,कुमार दाभाडे आदी विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.