विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी

गेल्या दोन दिवसांतील विविध निवडणूक निकालांचे कल पाहता गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. असे असले तरीही दिल्ली महानगरपालिका आणि हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपाला राखता आली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशासित राज्यात सत्ताबदल करण्यासाठी विरोधी पक्ष आशावादी आहे. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट होणे आवश्यक आहे; परंतु विरोधी पक्षांमधील अंतर्गत वाद शमत नसल्याने भाजपमुक्त भारत करण्याच्या त्यांच्याच स्वप्नांना खिळ बसण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय म्हणजे मतप्रवाह हा बाजूच्या बाजूने आहे, असे मानता येणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले, तर याला प्रत्युत्तर देताना भाजपने देशात २०२४ मध्ये पुन्हा ‘मोदीराज’च येईल, असे सांगून भाजपचा आत्मविश्वास दुणावल्याचे दाखवून दिले. सध्या तरी ‘मोदी ब्रँड’ पुढे विरोधी पक्ष निष्प्रभ ठरला आहे.

दिल्ली महानगरपालिका, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाप्रमामेच सहा राज्यातील पोटनिवडणुकींचाही निकाल जाहीर झाला आहे. यामध्येही भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. बिहारमधील एका जागेवरच भाजपाला यश संपादित करता आले. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालात विरोधी पक्षांनी चांगली मुसंडी मारली.

पोटनिवडणुकांबाबत बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी लोकसभा आणि रामपूरव व खतौली विधानसभांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी मैनपुरी लोकसभा आणि खतौली विधानसभेतीन सपाचे उमेदवार जिंकून आले. रामपूर विधानसभेतून भाजपाला यश मिळाले आहे. म्हणजेच, तीनपैकी एकाच जागेवर भाजपाला वर्चस्व प्रस्थापित करता आले. ओडिसा, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही विरोधी पक्षाने विजय मिळवला आहे.

भाजपाच्या हातून दिल्ली महापालिका आणि हिमाचल प्रदेशची सत्ता गेली असली तरीही गुजरातमधील यशाने भाजपाने संतुलन राखले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दरवेळी नवी सत्ता स्थापन होण्याची परंपरा असली तरीही येथील भाजपाची हार डोळेझाक करता येणार नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचलचे असूनही त्यांना आपला गड राखता आला नाही.

विरोधी पक्ष गेल्या आठ वर्षांपासून भाजपाविरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र विचारधारा आणि राजकीय स्पर्धेमुळे देशातील सर्व विरोधी पक्ष अद्यापही एकत्र येऊ शकलेले नाहीत. सर्वच बाजूने खिळखिळी झालेली असतानाही काँग्रेसलाच विरोधकांचे नेतृत्त्व करण्याची असलेली महत्त्वाकांक्षा विरोधी पक्षांच्या मतभेदाचे कारण आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि के. चंद्रशेखर राव हे गैरकाँग्रेस आणि गैरभाजपा पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक विरोधी पक्ष आपआपल्या पद्धतीने भाजपाला शमवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यात अजून तरी यश येताना दिसत नाही.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असताना काँग्रेसचे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. भारत जोडो यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक देत राहुल गांधी गुजरातला गेले होते. मात्र, गुजरातमध्ये त्यांची जादू फारशी चालली नाही. गुजरातमध्ये आपनेही प्रचाराचा धडाका लावल्याने यंदा तिहेरी लढत झाली. यामुळे तिन्ही पक्षांत मते विभागली जाऊन काँग्रेसला फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यात भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावेच लागेल, अन्यथा देशवासीयांना २०२४ मध्ये पुन्हा ‘मोदीराज’ पाहावयास मिळेल यात कसलाही संदेह नाही.