कोल्हापूर (प्रतिनिधी) : सायन पनवेल महामार्गवर कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका खासगी बसला आज (बुधवार)  पहाटे साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील १६ प्रवाशी जखमी आहेत. जखमीवर कामोठे येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एम एच ०८ ई ९२८७ या क्रमांकाची बस पहाटे कामोठे येथील पुरुषोत्तम पेट्रोल पंपा जवळील भुयारी मार्गावर आदळली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघात भीषण असल्याने १६ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमीत चार चिमुकल्यांचा आणि दोन गर्भवतींचा समावेश आहे.

कोल्हापूर येथून निघाल्यानंतर मुंबई ते पुणे महामार्गावर बस चालकाची बदली झाली. त्यानंतर ही बस महामार्गावर खाली उतरल्यानंतर कामोठे येथील पुरुषोत्तम पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामाला जाऊन आदळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.