कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. जनजागृती पाठोपाठच पोलीस प्रशासन आपल्याबरोबर दंड वसुली करून थुंकवीरांवर चाप लावण्याचा प्रयत्न करीत आहे. उद्या (रविवार) सकाळी ९.३० वाजता ताराराणी पुतळा (कावळा नाका) येथे  ‘अँटी स्पिट चळवळीच्या’ माध्यमातून  जनजागृती करणारे स्लोगन असलेले बॅनर, पोस्टर हातात धरून हे कार्यकर्ते मोहीम सुरु करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही अनिष्ट सवय दूर सारून शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी, रोगप्रसार रोखण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक झाली आहे. समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याबरोबरच प्रत्यक्ष सहभागाखेरीज आता याबाबत आपोआप बदल घडेल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. शाहूनगरीत उद्यापासून सुरू होणारी चळवळ या पुढे शहराच्या सर्व भागात त्यापुढे संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात पोहोचवण्याचा मनोदय असल्याचे अँटी स्पिटच्या सदस्यांनी सांगितले.