कळे (प्रतिनिधी)  : कळे (ता.पन्हाळा) येथील डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाला शरद जोशी शेतकरी संघटनेकडून टाळे लावण्यात आले.


यावेळी मागील वर्षीचा प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, कारखान्याच्या गेटच्या बाहेर शेतकरी वजन काटा बसवण्यात यावा व येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे वजन त्याच काट्यावरती करावे  व वजनकटा ऑनलाईन असावा, केंद्र सरकारने साखरेचा मूल्यांक दर प्रति  किलो ४५ रुपये करण्यासाठी कारखान्याने ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा,  २०२३-२०२४ मध्ये  गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ४००० रुपये दर जाहीर करूनच कारखाना सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. 


तसेच दत्त दालमिया साखर कारखाना, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना व पद्मश्री डॉक्टर डी.वाय.पाटील सह.साखर कारखाना या कारखान्यांना शरद जोशी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गट ऑफिसला टाळे ठोकण्यात आले. 


यावेळी पश्चिम महाराष्ट्र शरद जोशी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, कोलोलीकर,  आनंदा मगदूम,  सरदार पाटील, अरविंद पवार, दीपक पवार,  प्रकाश पाटील, बाजीराव पवार, बनाबाई पाटील, भाग्यश्री गुरव, सुलाबाई पाटील आदी उपस्थित होते.