मुंबई – राज्यात निवडणूक प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. रणरणत्या उन्हातही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. आरोपप्रत्यारोपाचे बॉम्ब फोडले जात आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. गोपनीय चर्चा उघड केल्या जात आहेत. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्ती पाठिंबा दर्शवल्यापासून ठाकरे गटाच्या नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत अशातच राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याने निशाणा साधला आहे.राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे, अशी सडकून टीका ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा लढवणारे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे

काय म्हणाले विनायक राऊत..?

राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा लढवणारे उमेदवार विनायक राऊत यांनी केलंय. तर राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही, असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे. आम्ही फुसकी लवंगी की अॅटम बॉम्ब हे ४ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळेल…असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत यांना दिलं आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे हे रत्नागिरीच्या कणकवलीमध्ये एकाच मंचावर उपस्थित असणार आहे. यावेळी राज ठाकरे यांची तोफ कणकवलीत धडाडणार असल्याचे म्हटले जातंय. यावरून विनायक राऊत यांना सवाल केला असता त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आता यावर राज ठाकरे काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.