मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. या सगळ्यावर निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेऊन आहे. यातच मागील आठवड्या शिवसेना ठाकरे गटाने आपले प्रचार गीत प्रसिद्ध केलं आहे. परंतु, निवडणूक आयोगाने यातील दोन शब्दांवर आक्षेप घेतला आहे. तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांचा व्हिडीओ दाखवला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रचार गीतामधील दोन शब्दांवर आक्षेप घेत ते शब्द काढून टाकण्यासंदर्भातील नोटीस ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आली आहे. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आज रविवारी (ता. 21 एप्रिल) उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद बोलवून निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागले. तसेच, निवडणूक आयोगाकडून आमच्यावर जर का कारवाई करण्यात येणार असेल तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांचा व्हिडीओ दाखवला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर कारवाई का नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे आणखी विचारणा केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली
मशाल गीतात “भवानी” शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. या संदर्भात आज उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशाल गीतातील भवानी शब्द हटवणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करा
भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.