कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवृत्तीनंतर अखंड शैक्षणिक कार्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन उद्योजिका आणि कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांनी केले. त्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांच्या निवृत्ती सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव वंदना काशीद होत्या.

पल्लवी कोरगांवकर म्हणाल्या की, शिक्षक हा अखंड विद्यार्थी असतो. आपल्या चौतीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत होणाऱ्या लाडसरांनी हे व्रत शेवटपर्यंत जोपासले. त्यांचा आंतरभारती शिक्षण संस्थेला अभिमान आहे.  लक्ष्मीपेक्षा सरस्वतीची सेवा करणारेच अनंतकाळ आठवणीत रहातात. दुर्देवाने आज नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण कमी होत चालले आहे.

यावेळी उपमुख्याध्यापक बी. ए. लाड यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांनी स्वागत केले. कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर आणि वंदना काशिद यांच्या हस्ते लाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच सुरगोंडा पाटील, संजय सौंदलगे, राजेंद्र बनसोडे, रेखा शिंदे, आरती जोशी या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या वतीने सहसचिव वंदना काशिद यांनी बाळाराम लाड यांना सन्मान चिन्ह त्यांचा गौरव केला.

यावेळी लाड यांनी, संस्थेबद्द्ल असणारी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन सोनाली महाजन यांनी तर वृषाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सुरेखा पोवार-मोरबाळे,  नंदा बनगे, दिनकर शिंत्रे, नफिसा जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.