रायगड : शरद पवार यांचं घर फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तटकरेंनी केलं आहे. मी अल्लाहला साक्षी मानून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करतोय,असे आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. गीतेंच्या प्रचारासाठी मंगळवारी (23 एप्रिल) स्वतः शरद पवार यांनी रायगडच्या मोर्बा येथे प्रचारसभेला संबोधित केलं. त्यांच्याबरोबर आमदार जितेंद्र आव्हाडही या सभेला उपस्थित होते. पवार आणि आव्हाडांनी या सभेद्वारे सुनील तटकरेंना त्याच्याच मतदारसंघात जाऊन आव्हान दिलं.

लोकसभा निवडणूकीच रणांगण आता सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवार यांच्याबरोबर गेले असून ते आता अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार गटाने यंदा पुन्हा एकदा तटकरेंना या मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने माजी खासदार अनंत गीतेंना येथून उमेदवारी दिली आहे.रायगड मधील सभेतून जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आव्हाड म्हणाले, मला या मंचावरून सुनील तटकरेंना विचारायचं आहे की, तुम्हाला शरद पवार  यांनी काय कमी केलं होतं ते आम्हाला सांगा. आधी तुम्ही ए. आर. अंतुलेंना (महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री) झोपवलंत. आता त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या की जावयाच्या खांद्यावर हात टाकून फिरताय. आज अंतुले वरून बघत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील. ”पवारांनी तुम्हाला काय नाही दिलं सांगा.तुम्हाला मंत्रिपद दिल,तुमच्या मुलीला मंत्रिपद दिलं तरी तुम्ही शरद पवार याचं घर फोडण्याच काम केलंत.तुम्ही शरद पवारांना म्हणत होतात की आपण भाजपमध्ये जाऊया पण पवार कधीही म्हणाले नाहीत की घर वाचवण्यासाठी भाजपमध्ये जाऊ. शरद पवार हे कधीही जातीयवादी लोकांशी  हात मिळवू शकत नाहीत, असंही  आव्हाड यावेळी म्हणाले.