कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ताराराणी प्राधान्य कार्डधारक दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात सेवा देताना त्यांना रांगेमध्ये न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.  जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजना राबविली जात आहे.

या योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांत दोन मुलीनंतर कुटुंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना व मुलींना सन्मानीत करण्यासाठी ताराराणी प्राधान्य कार्ड देण्यात आले आहे. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ताराराणी प्राधान्य कार्ड वितरण करण्यात आले आहे.

ताराराणी प्राधान्य कार्ड असलेल्या दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालये, घरफाळा, पाणी बील, वीज बील, सरकारी, खासगी दवाखाने, राष्ट्रीयकृत, नागरी, सहकारी, खासगी बँकातील सर्व व्यवहार, रेल्वे तिकीट आरक्षण, पोस्टामधील योजनेचे पेमेंट, गॅस नोंदणी-वितरण, एसटी तिकीट/आरक्षण, रेशन दुकाने, सब पोस्ट कार्यालये, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सिनेमा गृहे इत्यादी ठिकाणी आलेल्या ताराराणी प्राधान्यकार्ड धारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

ताराराणी प्राधान्य कार्ड दाम्पत्यांना रांगेत उभे केल्याबाबत तक्रार येणार नाही याची खबरदारी संबंधित कार्यालयाने घ्यावी, असेही जिल्हाधिकारी  देसाई यांनी म्हटले आहे.