व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपने लोकसभेसाठीची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा नावाचा समवेश आहे. यात भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकीय पटलावर अनेक तर्कवितर्क लावले जात असून उदयनराजे भोसले पुन्हा शरद पवारांसोबत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून उदयनराजे पर्यटकांना साद घालताना दिसत आहेत. तसेच व्हिडीओच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि दोन तुताऱ्या बाहेर आल्या. यातूनच उदयनराजे भोसले यांनी पुन्हा शरद पवार गटात जाण्याचे संकेत या व्हिडीओच्या माध्यमातून दिल्याच्या चर्चा सध्या सातारा शहरात सुरु आहेत.

दरम्यान, महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीतील दावेबाजी संपलेली नाही. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील २० जणांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामध्ये माढ्याचा समावेश आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

सातारच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा
सातारची जागा अजित पवार गटारने मागितली आहे. अजित पवार गटाकडून अजित पवारांनी देखील राज्यात राजकीय घडामोडी होत असताना सातारची जागा लढवणार असल्याचे संकेत दिले होते. यातच शरद पवार गटाकडून हा लोकसभा मतदारसंघ हक्काचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये शरद पवार गटाकडून सध्या राजकीय जोरदार हालचाली होत असतानाच सातारची जागा ही शरद पवार गटाची हक्काची मानली जात आहे.

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना दुसऱ्या यादीत साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होईल अशी अशा उदयनराजे समर्थकांना होती पण या यादीमध्ये नाव नसल्याने उदयनराजे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ते शरद पवारांची तुतारी हाती घेणार असे संकेत त्यांनी दिल्याचे बोलाले जात आहे.

उदयनराजे भोसले तुतारी फुंकणार
खासदार उदयनराजे भोसले अनेक व्हिडिओ ते सोशल मिडीयावर पोस्ट करत असतात. याआधी त्यांनी कार्यक्रमाचे, विकासकामांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये पक्षाचे चिन्ह असायचे पण उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी साद घालणार व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये कोठेही पक्षाचे चिन्ह दिसत नाही. मात्र या व्हिडीओच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन तुताऱ्या दिसत असल्याने खासदार उदयनराजे भोसले तुतारी फुंकणार असे संकेत त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणारा काळच सांगेल, उदयनराजे हाती कमळ धरणार की तुतारी फुंकणार.