कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील घरफाळा घोटाळयास जबाबदार असलेले माजी कर निर्धारक व अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आज कोल्हापूर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली.

संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा करून महापालिकेचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. भोसले यांच्या विरोधात आजवर अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक तक्रारी देखील झाल्या आहेत. तरी देखील त्यांच्यावर कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करण्यात आलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. कोल्हापूर विकास आघाडी, पीपल्स रिपब्लकन पार्टी, सेक्युलर सोशल फ्रट, कोल्हापूर विकास प्रेमी या संघटनांनी संजय भोसले यांच्याविरोधात कारवाईचे निवेदन दिले आहे.

यासंबंधीचे निवेदन शिष्टमंडळातर्फे आयुक्त कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. नजीकच्या काळामध्ये संजय भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास महापालिकेच्या दारामध्ये फुले, शाहू, आंबेडकरवादी पक्ष, संघटनांच्या हजारो लोकांच्या सोबत  बोंब मारो- ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नंदकुमार गोंधळी, संतोष कांबळे, दिग्विजय कांबळे, विजय कोरे, संभाजी वायदंडे, प्रशांत आवळे यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.