कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर उघडयावर ठेवल्याबददल महापालिकेच्या पथकाने येथील सूर्या हॉस्पिटलवर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे.

येथील सूर्या हॉस्पिटलने कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर आणून उघडयावर ठेवला असल्याची ऑनलाईन माहिती महापौर निलोफर आजरेकर यांना मिळाली.  त्यानुसार महापौर निलोफर आजरेकर यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पथकाला पाहणी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही कारवाई केली.

शहरातील सर्वच हॉस्पिटल्सनी त्यांच्याकडील कोविड कचऱ्याची (बायोमेडिकल वेस्ट) योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करणे बंधनकारक असतांना कोविड कचऱ्यांच्याबाबतीत निष्काळजीपणा करुन कोविड कचरा रस्त्यावर उघडयावर ठेवणे ही बाब अतिशय गंभीर आहे. यापुढे सर्वच हॉस्पिटल्सनी महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही महापौर यांनी केले आहे.

शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी नेहमी मास्कचा वापर करण्याबरोबरच विना मास्क येणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करणाऱ्या ग्राहकांना वस्तु देऊ नयेत, अशी सूचनाही महापौर  निलोफर आजरेकर यांनी केली. तसेच सायंकाळी ७ नंतर व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी दुकान सुरु ठेऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली.