नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती राजवट लागू करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची याचिका विक्रम गेहलोत यांनी दाखल केली होती. मात्र आज (शुक्रवार) या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दांत याचिकाकर्त्याला सुनावले आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सरकार संविधानाच्या आधारावर काम करत नाही असा आरोप करीत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विक्रम गेहलोत यांनी याचिकेत केली होती. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नाही. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहीत आहे का ? केवळ मुंबईतील घटनांवरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, असे प्रश्न करीत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गेहलोत यांना खडे बोल सुनावले.