अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन कणेरी मठावर करण्यात आले आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून या या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक मंत्रालयात पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ही बैठक पार पडली असून सुमारे ३० लाख लोक सहभागी होणार आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं असून ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरच्या कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लाखो लोक या सोहळ्यात सहभागी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचे संतूलन बिघडलेले आहे. त्यासाठी हा सोहळा घेतला जात आहे.

या महोत्सवास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह आठ राज्यांचे राज्यपाल, सुमारे ८०० कुलगुरू आणि साधू संत यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होईल. अशी माहिती देखील आयोजकांनी दिली आहे.

महोत्सवात नेमकं काय महत्त्वाचं ?

  1. महोत्सवात एकूण हजार स्टॉल उभारणार
  2. या महोत्सवात सुमारे दोनशे पर्यावरणवादी सहभाग नोंदवणार
  3. दोनशे डॉक्टर एकत्र येत आयुर्वेदीक गॅलरी उभारत देणार माहिती
  4. देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार
  5. चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चर सेवा
  6. महोत्सव व पार्किंगसाठी ५०० एकर जागा
  7. एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन
  8. गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन