(विशेष)

भारत सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केलेल्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत. 

ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. ‘रंगल्या रात्री’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली होती. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली. लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका देण्याचे काम त्यांनी केले. सुलोचनाबाईंनी लावणीसह भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले होते.

सुलोचना चव्हाण या माहेरच्या सुलोचना कदम होत. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनला सुरुवात केली होती. त्यावेळी मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता ‘श्रीकृष्ण बाळमेळा’. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते.

या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका साकरल्या. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.

श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते ‘कृष्ण सुदामा’. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले.

वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या ‘भोजपुरी रामायण’ गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले.

मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी….’ आचार्य अत्रे यांनीच त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला.

सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे २००९ चा राम कदम पुरस्कार, २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.