कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना काल दिनांक 2 जानेवारी रोजी कसबा बावडा येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने प्रकाश चिटणीस यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास सर्व कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषण करतील, असा असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत असणारे कार्यकारी संचालक हे कारखान्यामधील हजारो कर्मचारी, हजारो तोडणी वाहतूकदार, हजारो ऊस उत्पादक शेतकरी, शेकडो मालपुरवठादार व्यापारी तसेच कारखानदार अवलंबून असणारे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे चालवणारे हजारो व्यवसायिक तसेच कारखाना व्यवस्थापन व शासन यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून कार्यकारी संचालक आपले कार्य करीत असतात.

परंतु कार्यकारी संचालक या पदास कोणतेही संरक्षण नसल्यामुळे अत्यंत निंदनीय अशा घटना घडत आहेत. याबाबत संबंधितावर तत्काळ कारवाई आवश्यक आहे. अन्यथा सर्व कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करून आपल्या कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषण करतील असेही निवेदनात म्हटले आहे.