टोप (प्रतिनिधी) : पुलाची शिरोली गावातील वाढती लोकसंख्या पहाता ग्रामीण रुग्णालय तसे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्र मंजूर व्हावे. अशी मागणी शिरोली सरपंच शशिकांत खवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज (बुधवार) आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिरोली गावातील वाढती लोकसंख्या तसेच याठिकाणी असणारी औद्योगिक वसाहतीमुळे हजारो नागरीक याठिकाणी वास्तव्यास येत आहेत. यामुळे गावची लोकसंख्या वाढून कांही वाड्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात येण्यासाठी रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय, माळवाडी आणि यादववाडी या भागात आरोग्य उपकेंद्र सुरू करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, सलीम महात, प्रकाश कोंदाडे, बाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.