अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्हा नियोजन समिती निधीतून मंजुर करण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे भुमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीला अधोरेखित करून शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनीही देशाच्या प्रगतीत बहुमोल योगदान द्यावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

यावेळी ना. पाटील यांनी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल. केंद्र सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे.

या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणातील रचनात्मक बदल, अभ्यासक्रमातील सुसूत्रता, अध्यापनाच्या अभिनव पद्धती, मूल्यमापनातील सुधारणा, मातृभाषेतून शिक्षणाच्या संधी, नवीन अभ्यासक्रमांतील एकसमान पद्धती अशा विविधांगी पर्यायांतून नवी शिक्षण व्यवस्था निर्माण होईल. यातून स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल. या शैक्षणिक धोरणामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराचे विविध पर्याय नवयुवकापुढे निर्माण होईल. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन ना. पाटील यांनी केले.

यावेळी आ. प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी नगरसेवक तुषार भारतीय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  मुख्य अभियंता गिरीश जोशी, रुपा गिरासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, डॉ. एस.पी. बुरघाटे, डॉ. एस.पी. बाजड आदी उपस्थित होते.