कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी मागणी आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील बऱ्याच विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सुरु होते. यावर्षी जगातील अमेरिका, इंग्लंड या सारख्या अनेक देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथील विद्यापीठांचे ऑफलाईन पध्दतीने शैक्षणिक कामकाज सुरु होणार आहे. कोरोनाच्या सद्याच्या काळामध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विमान प्रवास तसेच शिक्षणासाठी परदेशात राहण्यासाठी परवानगी दिली जाते. पण कोल्हापूर जिल्ह्यात सद्या प्राधान्याने 45 वर्षांवरील नागरीकांनाच लस दिली जात आहे.

त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. सद्या मुंबई आणि पुणे या शहरामध्ये परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे पाहून लस दिली जात आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची सुविधा अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर कोल्हापूरात सुध्दा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केलेली आहे.