कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती तसेच अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने काही अज्ञात समाजकंटकांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील परिपत्रकात फेरफार करून दि. २३ ऑगस्ट रोजीचा एम.एस्सी.चा फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर रद्द केल्याचे समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केले. एका वृत्तपत्रातील बातमीत फेरफार करून समाजमाध्यमांतून व्हायरल केली. यामुळे परीक्षार्थींसह महाविद्यालये, प्राचार्य आदी घटकांत मोठा संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला ऐन परीक्षेच्या कालखंडात मोठी धावपळ करावी लागली.

शिवाजी विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षाविषयक गंभीर, गोपनीय आणि अतिमहत्त्वाच्या कामाविषयी समाजात चुकीचा संदेश जाण्याबरोबरच विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेडरहेड यांचाही गैरवापर केल्याचे आढळून आले.  प्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्ययावत सायबर सेलमार्फत चौकशी करून समाजातील या विकृत मनोवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने दोषी व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवाजी विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बलकवडे यांना दिले. त्यांच्यासमवेत परीक्षा विभागाचे उपकुलसचिव निवास माने होते.

विद्यार्थी तसेच सर्व संबंधित घटकांनीही अशा समाजमाध्यमांद्वारे व्हायरल होणाऱ्या बाबींवर पटकन विश्वास न ठेवता आपापले महाविद्यालय, विद्यापीठ प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्याची शहानिशा करावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर परीक्षा संचालक डॉ. जाधव यांनी केले आहे.