चंदगड (प्रतिनिधी) : रामोशी-बेरड या जमातीचा अनुसूचित जाती जमातीच्या यादीमध्ये समावेश करावा. म्हणून केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी आणि इतर मागण्यांबाबत आज (गुरुवार) जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चंदगडचे नायब तहसीलदार विलास पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, रामोशी-बेरड समाजाचा विकास आराखडा तयार करावा, उमाजी नाईक यांच्या चित्रपटासाठी निधी देण्यात यावा, उमाजी नाईक आणि बहिर्जी नाईक यांचा पाठ्यपुस्तकांमध्ये संपूर्ण इतिहास समाविष्ट करावा. तसेच उमाजी नाईक यांच्या स्मारकाला निधी देण्यात यावा, शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव गुहागर-विजापूर राज्य महामार्गाला देण्यात यावे, रामोशी वतनी जमिनी परत कराव्यात.
तसेच महाराष्ट्रातील बेरड-रामोशी समाजाला भारतीय राज्य घटनेचे कलम ३४१ व ३४२ नुसार घटनात्मक आधिकार प्राप्त झालेले असून सुद्धा गेली अनेक वर्षे याची अंमलबजावणीच झाली नाही. अजूनही अनुसूचित जाती जमातीचा सुधारित कायदा १९७६ ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही. या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते अमोल नाईक, सीतारामजी नाईक, आप्पाजी चिंचनगी, आप्पाजी चाळूचे, गंगाराम नाईक, धोंडिबा नाईक, विलास नाईक, परसू नरी, जयवंत नाईक आदी उपस्थित होते.