कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूधसंघाची निवडणूक स्थगित करावी, याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवार) ऑनलाईन सुनावणी झाली. याबाबत राज्य सरकारने आपले म्हणणे २६ एप्रिलपूर्वी सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे याबाबतचा निकाल लांबणीवर पडला असून निवडणूकीची प्रक्रिया मात्र सुरुच आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल्या असताना फक्त गोकुळ दूधसंघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु ठेवल्यामुळे गोकुळमधील सत्तारूढ आघाडीच्या वतीने ही निवडणूक स्थगित करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याबाबतची पहिली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. यामध्ये सत्तारूढ आघाडीच्या वतीने अँड. लुईस शहा यांनी सध्या गोकुळच्या काही मतदारांना झालेली कोरोनाची लागण आणि एका मतदाराचा झालेला मृत्यू याबाबतचीही माहिती सादर केली. यावेळी राज्य सरकारने याबाबत आपले म्हणणे २६ एप्रिलपूर्वी सादर करावे यासाठी राज्य सरकारला नोटीस जारी करावी, असे आदेशात म्हटले आहे.

यामुळे आता पुढील सुनावणीनंतरच याबाबतचा निर्णय होणार असला तरी गोकुळच्या निवडणूकीची प्रक्रिया मात्र सुरुच आहे. उद्या (मंगळवार) माघारीची अंतिम तारीख आहे. त्यानंतर चिन्ह वाटप आणि २ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.