नाशिक (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ आगारातील बसचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) घडली आहे. गहनीनाथ गायकवाड (वय ३३, मूळगाव- मामावली ता. आष्टी, जि. बीड) असे कर्मचाऱ्याचे नांव आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

सुलभानगर भागात राहणारे गायकवाड गेल्या पाच वर्षांपासून पेठ आगारात चालक म्हणून कार्यरत होते. कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज ते घरी होते. घरातील गॅस संपल्याने गायकवाड मोठ्या विवंचनेत होते. आर्थिक ओढाताणीमुळे हतबल झालेल्या गायकवाड यांनी आपल्या खोलीचे दार बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पत्नी आणि मुले घरात होती.