रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. रत्नागिरीतील सामंत बंधूंमधील वाद सर्वांसमोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. तसेच कार्यालयावरील नाव बदलत उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावणार असल्याची भूमिका किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे किरण सामंत लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अद्यापही नाराज असल्याचं यानिमित्ताने बोललं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, किरण सामंतांच्या कार्यलयावरील बंधू उदय सामंताचा फोटो आणि बॅनर हटवण्याता आला आहे. किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर नेमके का हटवण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नेमका हा वाद काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिणामी किरण सामंत यांचा याला दुजोरा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

रत्नागिरीतील शिवसेनेच्या दोन कार्यालयावरून उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर हटवले गेलेले आहेत. रत्नागिरीतील जयस्तंभ, माळ नाका आणि मारुती मंदिर ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालय आहेत. शहरातील जयस्तंभ या ठिकाणच्या कार्यालयामधून उदय सामंत यांचा कारभार चालतो. तर उर्वरित दोन कार्यालयांमधून त्यांचे थोरले बंधू किरण सामंत कामकाज पाहतात. या दोन्ही ठिकाणी कामानिमित्त उदय सामंत यांचा येणे-जाणे असते.

माळनाका आणि मारुती मंदिर या ठिकाणच्या कार्यालयावरून उदय सामंत यांचा फोटो आणि फोटो असलेले बॅनर हटवले गेले आहेत. त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावला गेला असून त्यावर उदय सामंत यांचा फोटो नसून, किरण सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत.

उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया

यावर उदय सामंत यांनी सावधगिरीची प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मोठ्या भावाचा गैरसमज होणार नाही, पण झाला असेल तर तो दूर करणं माझी जबाबदारी आहे असं ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. जर ते रागाने बोलले तर त्यांना हक्क आहे. ते माझे वडीलभाऊ आहेत असंही सांगत त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला.

पुढे ते म्हणाले की, “मला समाधान आहे की, माझा फोटो काढला असला तरी तिथे माझ्या मोठ्या भावाचा, एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. मोठ्या भावाच्या फोटोत जर मी माझं प्रतिबिंब पाहत असेन तर मला राग येण्याचं कारण नाही”.