कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुंभार समाजाच्या प्लॉट हस्तांतरण, कर्ज बोजा आदी विषयी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.


या बैठकीत, कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर ही संस्था सन १९५७ साली स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेअंतर्गत नोंदणीकृत सभासदांना व्यवसायासाठी बापट कॅम्प येथील सुमारे २९ एकर २५ गुंठे इतकी जागा सन १९६४ मध्ये कब्जापट्टीद्वारे देण्यात आली आहे. या जागेचे संस्थेने गरजू व पात्र सभासदांना वाटप केले होते. परंतु, गेल्या दहा वर्षात कुंभार समाजातील पात्र सभासदास जागा हस्तांतरित करण्याचे काम थांबले असल्याने सभासदांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार प्लॉट हस्तांतरित करण्यास, कर्ज बोजा नोंद होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून सदर जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, या दोन्ही बाबतीत सविस्तर बैठक घेवून कुंभार समाजाच्या जागेच्या मालमत्ता पत्रकासंदर्भात असणाऱ्या सर्व अडचणी दूर कराव्यात असे सूचित केले. यासह कब्जापट्टीद्वारे वितरीत केलेली जमीन मालकी हक्काद्वारे कुंभार समाजातील सभासदाला देण्याच्या दृष्टीने सदर संस्थेकडून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्याच्या सूचनाही क्षीरसागर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, मालकी हक्कासंदर्भातील प्रस्ताव संस्थेच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन दिले. तसेच भोगवटादार वर्ग १ नोंद पूर्ववत करण्याबाबत नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याचे आदेश संबधित तहसीलदारांना दिले.

यावेळी जिल्हा भूमापन अधिकारी सुदाम जाधव, नगर भूपान अधिकारी शशिकांत पाटील, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, महसूल तहसीलदार सरस्वती पाटील, मंडल अधिकारी संतोष पाटील, मुख्य तलाठी विपिन उगलमुगले, कनिष्ठ लिपिक अस्मिता काकोडकर, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित कुंभार, माल उत्पादक सोसायटी चेअरमन महिंद्र नागांवकर, मूर्तिकार संघटना अध्यक्ष प्रमोद कुंभार आदी उपस्थित होते.