मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सोनू सूद कायमच चर्चेत असतो. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये नागरिकांची मदत केल्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. लॉकडाऊननंतरही सोनू सूदने त्याचे मदतीचे कार्य थांबवलेले नाही. अनेक माध्यमातून तो लोकांच्या मदतीसाठी कायमच धावून जात असतो. यासाठी त्याने संस्थादेखील सुरू केली आहे.

सोनू सूदने गेल्या वर्षी यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेसची घोषणा केली होती. ‘डिवाईन इंडिया यूथ असोसिएशन’ आणि सोनू सूदची संस्था मिळून यावर काम करत आहेत. आयएएस अधिकारी होऊन देशाच्या सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना या मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. नुकतीच यासाठी सोनू सूदकडून स्कॉलरशिपची घोषणाही करण्यात आली आहे.