मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांनी काल त्यांच्याविषयी केलेल्या विधानांवरून खडसे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी एका सभेत माझ्याविरुद्ध अत्यंत घाणेरडे विधान केले होते. त्यामुळेच मी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा खटला संपलेला नाही, त्यामुळे तो संपल्याचे जे ते सांगतात ते खोटे आहे. खडसेंविरोधात मी जे काही आरोप केले त्यासाठी मला जळगावचेच चंद्रकांत पाटील यांनी मदत केली. देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आज (गुरुवार) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खडसे यांचेसह माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली.

दमानिया यांनी सांगितले की, खडसे हे खुनशी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनी मला विविध मार्गांनी छळले. फडणवीस यांनी मला खडसे यांचेविरुद्ध फिर्याद देण्यास सांगितले, हे खोटे आहे. मीच त्यांच्या अश्लील टिप्पणीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अर्थात, फडणवीस यांना सोयीस्कर राजकारण करायचं असेल त्यामुळेच त्या एफआयआरपुढे काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. बाई गोंधळ करत होती म्हणून एफआयआर दाखल झाली असे फडणवीस म्हणाल्याचे विधान खडसेंनी केले होते. यावर ‘मी गोंधळ करत होते ? आज जर असं काही घडलं तर अमृता फडणवीस यांच्याबाबत फडणवीस असे बोलतील का ? असा सवालही त्यांनी केला.

खडसेंविरोधात मी जे काही आरोप केले त्यासाठी मला जळगावचे गजानन आणि जळगावचेच चंद्रकांत पाटील यांनी मदत केली. देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसेंनी ३ सप्टेंबर २०१७ सभेत माझ्याबाबत अश्लील भाषा वापरली. एवढ्या खालच्या दर्जाचं ते बोलले त्याबाबत मी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सभेत ते  असभ्य बोलले, असेही त्या म्हणाल्या.

चंद्रकांत निंबा पाटील हे सध्या मुक्ताईनगर, जळगाव येथील आमदार असून त्यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना पराभूत केले होते. ते सध्या शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख आहेत.