टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आमचा विरोध आहे आणि तो कायमच राहणार आहे. केएमटी बंद केली, तर आम्ही दूध, भाजीपाला बंद करु शकतो हे विसरू नका, असा इशारा शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी दिला आहे.

कृती समितीने भान ठेवून शहराची हद्दवाढ मागणी करावी. यात जनतेला त्रास होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये. अन्यथा आम्ही सुद्धा शहराला वेठीस धरु शकतो, हे विसरू नये. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने केएमटी सेवा बंद केली, तर आम्ही सुद्धा शहराचा दूध पुरवठा आणि भाजीपाला बंद करू. सिमेंट, वाळू, मार्बल, सर्व जीवनावष्यक वस्तूंची गोदामे ही शिरोलीत आहेत. इंधन शिरोली सांगली फाटा आणि शिये फाटा येथून जाते ते सुद्धा आम्ही आडवू शकतो, असाही इशारा खवरे यांनी दिला आहे. शहराच्या हद्दवाढीत आम्हाला यायचे नसेल, तर आपली जबरदस्ती का आणि कशासाठी? आमचा ग्रा.पं.चा गावगाडा चांगला चालला आहे. त्यामुळे आम्हाला शहरात यायचे नाही, असे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

केएमटी ही आमच्यामुळे चालली आहे. शहराबाहेरच्या केएमटी फेऱ्या बंद केल्या, तर केएमटी बंद पडून यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेरोजगार होतील. शहर आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाद होईल असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समीतीने १८ सप्टेंबर रोजी ४२गावांची सर्किट हाऊस येथे दुपारी ३ वाजता बैठक बोलावली आहे.

केएमटी बंद करणे हे चुकीचे आहे. याच केएमटीमधून शहरातील कामगार वर्ग रोजगारासाठी एमआयडीसीत येतात- जातात. त्यांना त्रास होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये. यामुळे उद्योगाचा गाडा बंद पडेल, असे स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी म्हटले आहे.