पन्हाळा (प्रतिनिधी) : बेहरानमधील रोही येथे झालेल्या २१ व्या एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये २० वर्षांखालील मुलांच्या संघाने रौप्यपदक मिळवले. २० वर्षांनंतर हे यश मिळवल्याने भारतीय संघ २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

देशात आगमन झालेल्या व्हॉलीबॉल संघाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिल्लीमध्ये अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अशी माहिती महासंघाचे सहसचिव व राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रा.
बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिली.

एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून भारताला रौप्यपदक मिळवून देण्यामध्ये संघाचा कर्णधार दुष्यंतसिंह जाखर याचा सिंहाचा वाटा आहे. बेस्ट ब्लॉकर म्हणून जाखरला, तसेच उत्कृष्ट लिबेरो म्हणून कार्तिकेयन यालाही गौरवण्यात आले. उपराष्ट्रपती धनकड यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केल्यामुळे संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा उत्साह वाढला आहे. भारतीय संघ जागतिक क्रमवारीत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करेल, असा विश्वास भारतीय व्हॉलीबॉल संघाचे मुख्य आधारस्तंभ, राजस्थान ऑलिम्पिक संघटनेचे चेअरमन व आंतरराष्ट्रीय खेळाडू राम अवतारसिंह जाखर यांनी व्यक्त केला.