मुंबई (प्रतिनिधी) : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन रेशीम कोष खरेदी आणि विक्री केंद्रास मान्यता दिल्याने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मध्यवर्ती ठिकाणी रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह आसपासच्या शेकडो रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोष विक्री आणि खरेदी करणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
मुंबईतील रेशीम संचालनालयाची बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथे हे तिसरे रेशीम कोष खरेदी विक्री केंद्र सुरू होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८४ टन, सांगली जिल्ह्यामध्ये २२ टन व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २ टन रेशीम कोष उत्पादन होते. यामुळे उत्पादित रेशीम कोष विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना, बारामती आणि कर्नाटक राज्यात जावे लागत होते. मात्र जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत नवीन केंद्र मंजूर झाल्याने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजार पेठ उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग तसेच आसपासच्या जिल्ह्यातील आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील शेकडो शेतकऱ्यांना जवळच्या अंतरावर कमी वाहतूक खर्चात रेशमी कोष बाजारात आणणे शक्य होणार आहे.