टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा मानली जाणारी श्री जोतिबा यात्रा रद्द झाली आहे. कर्नाटक, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर भागातील लोकांचे आराध्यदैवत असलेले खोची येथील २५ एप्रिलपासून सुरु होणारी भैरवनाथ देवाची यात्रा, आणि पुढील महिन्यातील पाकाळणी उत्सव भाविकांसाठी रद्द करण्यात आला असल्याची माहिती दक्षता समिती तसेच ग्रामपंचायतीने आज (शनिवार) निवेदनाद्वारे दिली.

श्री जोतिबाची यात्रा व खोची येथील श्री भैरवनाथ यात्रा एक-दोन दिवसांच्या अंतराने होत असते. काही सासनकाठ्या दोन्ही देवांना जात असतात. मात्र, यंदा ही यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. यात्रेचे धार्मिक कार्यक्रम काही मोजक्याच मानकऱ्याच्या उपस्थिती होणार आहेत. वडगाव पोलिसांकडून बंदोबस्त ठेवणेत येणार आहे. नागरिक तसेच भक्तांनी मंदिर परिसरामध्ये येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.