मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेने हे नाटक केले असल्याचा संशय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार गेले की पाठवले असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राऊत यांनी दिलेली ऑफर त्याचाच एक भाग आहे का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेसोबत थेट सर्व आमदार गेले नाहीत. छोट्या गटाच्या माध्यमातून आमदार गुवाहाटी येथे जात आहेत. त्यामुळे संशय बळावतो आहे, अशी चर्चा सुरू आहे. एकत्र ३७ आमदार गेले असते तर शिंदेंना निर्णय घ्यावा लागला असता, पण आता हळूहळू आमदार गेल्याने या नाट्यास वेळ मिळतो आहे. शेवटपर्यंत शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार होऊ देणार नाही. आतापर्यंत ३५ शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र आहेत. त्यात दादा भुसे दाखल झाले तर ही संख्या ३६ होईल. अजून एक आमदार आल्यास शिंदेच्या गट पूर्ण होईल.

शिवसेनेतून किती आमदार खरे गेले आहेत. किती लोकांना पाठवले गेले आहे. हे कोणाला माहीत नाही. याचा अंतिम निर्णय अजून लागलेला नाही आहे. ३७ लोक जर फुटलेल्या गटाबरोबर गेले असतील, तर ते अपात्र होणार नाहीत. पण ३६ गेले असतील तर ३६ च्या ३६ अपात्र होतील. इथे जो पक्ष आहे तोच खरा शिवसेना पक्ष आहे.

आसाममध्ये जे गेले आहेत तिथून त्यांना नवीन पक्ष आमचा आहे, असा दावा करता येत नाही. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. राजकीय पक्षाला कोणते चिन्ह द्यायचे हा त्यांचा निर्णय असतो. त्यामुळे त्यांना हे सिध्द करावे लागेल. जर ते हे सिध्द करु शकले तर त्यांना हे चिन्ह मिळेल. एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्हासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.