औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप व मित्रपक्ष यांच्यात थेट लढत होत आहे. त्याचप्रमाणे काही वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. असे असताना शिवसेनेच्या एका नेत्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी चक्क अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याची ऑडिओ क्लीप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे.

‘मराठवाड्यातील उमेदवार रमेश पोकळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून अनेक लोकांची कर्ज प्रकरणे करून दिली आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी या रमेश पोकळे या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं,’ असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले आहे. पाटील यांची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. तसंच महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चादेखील सुरू आहे. यातच ही क्लिप समोर आल्याने राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या क्लिपबद्दल मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे.