टोप (प्रतिनिधी) :  वाहतूकीला अडसर ठरणाऱ्या वाहनांवर शिरोली पोलिसांनी कारवाई करत १२ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई  शिरोली एमआयडीसी एचएमटी फाटा ते सांगली फाटा, मार्बल लाईन परिसरात करण्यात आली.

शिरोली एचएमटी फाटा ते सांगली फाटा सेवा रस्त्यालगत ट्रान्सपोर्ट ऑफिस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या सेवा रस्त्यावर पार्किंग करून ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन बसतात. यामुळे सेवा रस्त्यावर नेहमी ट्रॅफिक जाम होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कामगार घरी जात असल्यामुळे या परिसरात छोटे-मोठे अपघात ही झाले आहेत.

सांगली ते कोल्हापूर मार्गावर सांगली फाटा ते हालोंडी गावाच्यादरम्यान सर्वात मोठी मार्बललाईन आहे. या परिसरात दुकानदार आपल्या गाड्या सेवा रस्त्यावर लावतात. यामुळे वाहतूकीला अडथळा होत होता. त्यामुळे आज शिरोली पोलिसानी ६० वाहनांवर दंडात्मक कारवाई करत १२ हजारांचा दंड वसूल केला.

ही कारवाई सपोनि. राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस,  सुरेश कांबळे , शशिकांत मेतके यांनी केली.