टोप (प्रतिनिधी) : अवैध दारू विक्रीविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी कासारवाडी, जठारवाडी, शिये आणि मौजे वडगाव या ४ गावामध्ये धडक कारवाई करत सुमारे ७२ हजारांचे देशी-विदेशी व गावठी मद्य जप्त केले. याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

जठारवाडी (ता. करवीर) येथील शिये-भुये रस्त्यालगत स्टार परमिट रूम बियर बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एकजण देशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलीस पथकाने कारवाई करत अनिल गणपती पाटील (वय ४०, निटवडे, ता. करवीर) याला देशी बनावटीचे मद्य विकत असताना  रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २८ हजाराचे मद्य जप्त केले.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शिये हद्दीतील झुंज चिकन सेंटरच्या टपरीवर व मौजे वडगाव येथील माळावर अशा दोन ठिकाणी अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. यात एकनाथ बबरू कोळी (वय २६, गणपती मंदिर शेजारी, पुलाची शिरोली) व संजय कांबळे (वय ३४, माळवाडी, मौजे वडगाव, ता. हातकणंगले) यांना ताब्यात घेतले. तर कासारवाडी येथे पोलिसांनी रविराज कुमार पाटील (वय २१) याला मद्य विक्री करताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१ हजार रुपयांचा मद्य साठा जप्त केला.