कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांचे नाव काही दिवसांपासून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चर्चेत आले आहे. सोशल मीडियातही यावर अनेक पोस्ट फिरत आहेत. यावर आज (गुरुवारी) सौ. महाडिक यांनी फेसबुकवर मत व्यक्त केले. पुणे पदवीधर मतदारसंघातून माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. पण याबाबत मला काहीच माहीत नाही, त्यामुळे माझ्यासाठी हा धक्काच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यापूर्वी भाजपकडून पुणे पदवीधर मतदासंघातून निवडणूक लढवायचे. पण ते सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. म्हणून पक्षात त्यांचे वारसदार कोण अशी चर्चा सुरू आहे. वारसदार कोल्हापूरचे असतील की पुण्याचे याबाबत पाटील यांनीही अद्याप गोपनीयता पाळली आहे. यातच शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत आले आहे. यासंबंधी महाडिक यांनी फेसबुकवर आपले म्हणणे मांडले आहे.

त्या म्हणतात, सध्या सर्वत्र पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांनी या मतदासंघाचे नेतृत्व करावे, असे आपणा सगळ्यांनाच वाटते. याआधी चंद्रकांत पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे या मतदारसंघाचे नेतृत्व केल्याने या निवडणुकीत वेगळे महत्त्व आहे. बरेच इच्छुक असतानाही अचानक माझे नाव पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून लोकांसमोर येणे ही बाब खरं तर माझ्यासाठी धक्कादायकच आहे.