मुंबई ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप प्रणित राज्य सरकारशी हातमिळवणी केली. आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार या दोन गटातील वितुष्ट वाढत गेलं. यानंतर दोन्ही गटात आरोप – प्रत्योरोपाच्या फैरी सुरु झाल्या. यापार्श्वभूमीवर आता थोरल्या पवारांनी वर्मी घाव घातला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार यांनी अजित पवार यांना फटकारलं आहे. यावेळी बोलताना थोरले पवार म्हणाले की, भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे.

शेतकरी कामगार पक्षासारखे काही आणखी पक्षही येतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. याबरोबर अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार असल्याचा टोला पवारांनी हाणला आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आमच्यातील काही लोकांचा भाजपासोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नाही. त्यापुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती. आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे शरद पवार म्हणाले. यानंतर अजित पवारांची घरवापसी शक्य नसल्याचं म्हणत त्यांच्या परतीची दारे बंद असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे.