मुंबई : शिवसेना उबाठा गटाकडून बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी १७ जागांच्या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये सांगलीसह मुंबईतील जागांचाही समावेश आहे.उद्धव ठाकरे यांनी आघाडीधर्म न पाळल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केले. त्यात ईशान्य मुंबईचाही समावेश आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही असून ही आमच्या हक्काची जागा असून ती आम्हाला सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे.

आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा आम्ही कमी नाही. भांडण, रस्सीखेच वैगेरे नाही पण मुंबईतील हक्काची जागा आम्हाला मिळायला हवी. ईशान्य मुंबई द्यायची नसेल तर दक्षिण मध्य मुंबई द्यावी. आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत. मित्रपक्षांनी याची दखल घेतली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार. आमची हक्काची जागा मिळायला पाहिजे हे पक्षश्रेष्ठीही मान्य करतील असंही विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या ६ जागांपैकी ठाकरे ४ जागांवर उमेदवार देत असतील तर ईशान्य मुंबई ही जागा आमच्या हक्काची आहे. आमच्याकडेही उमेदवार आहेत.उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आम्ही विनंती करून त्यांनी जागा सोडली तर ठीक, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी विचार होऊ शकतो, असा इशाराही चव्हाण यांनी दिलाय.