कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा राजघराण्यातून लोकसभा निवडणूक लढवली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात मोदी विरुद्ध गादी असा प्रचार सुरु असून महायुतीला लक्ष्य केलं जात आहे. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती याचे विवरण समोर आले आहे. 

त्यानुसार, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे. यातच विशेष म्हणजे शाहू महाराजांवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. शाहू छत्रपतींची 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख व 23 कोटी 71 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. 122 कोटी 88 लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन आहे.