कागल (प्रतिनिधी) : कर्नाटक आणि कोकणातून येणाऱ्या नागरीकांच्या तपासणीसाठी कागल चेकपोस्ट, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत स्वॅब तपासणी केंद्रांची उभारणी करा. असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. ते कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच प्रवेश द्या आणि ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना परत पाठवा, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.

ना. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३,८५७ जण बाधित झाले आहेत. त्यापैकी ३,१४७ जण उपचार घेऊन, बरे होऊन  घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ५८१  सक्रिय रुग्ण असून १२९ जणांचे मृत्यू झाले आहेत. कागल तसेच गावोगावी उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरममध्ये तीनशेहून अधिक बेड शिल्लक आहेत. वाढवलेल्या कोरोना टेस्टिंगमुळे पॉझिटिव्हिटी रेटही कमी झालेला आहे. हा रेट चार टक्के इतका झाला असल्याचे सांगितले.

या बैठकीला जि.प. सदस्य युवराज पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, डॉ. अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.